Principal's Desk

Dr.Bharat Shinde.
Principal, Vidya Pratishthan's Arts, Science And Commerce College


विद्या प्रतिष्ठानचा सुवर्णमहोत्सव

बारामती: माननीय श्री शरदचंद्रजी पवार साहेबांच्या दूरदृष्टीकोनातून दि. १६ ऑक्टोबर १९७२ रोजी बारामती येथे विद्या प्रतिष्ठान या संस्थेची स्थापना झाली. शिक्षण क्षेत्रातील ही दिग्गज संस्था चालू वर्षी आपले सुवर्णमहोत्सवी वर्ष साजरं करत आहे. ग्रामीण भागातील हुशार, होतकरू मुलांना उच्च प्रतीचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून उपलब्ध करून देण्याच्या हेतूने, सर्व सोयी सुविधांनी सुसज्ज अशी इंग्रजी माध्यमाची शाळा प्रथम बालविकास मंदिर या नावाने बारामती येथे सुरू करण्यात आली. बोर्डाच्या परीक्षेनंतर बारामती येथील अनेक मुले व मुली पुण्यात पुढील शिक्षणासाठी जात होती. परंतू तेथे निवास व्यवस्थेचा प्रश्न भेडसावत असे. म्हणून खास बारामती येथील २५० मुलांसाठी गोखले नगर येथे व २०० मुलींसाठी कर्वेनगर येथे स्वतंत्र व सुसज्ज असे वसतिगृह उभारण्यात आले. बारामती येथे एमआयडीसीची स्थापना झाल्यानंतर या परिसराचा व शहराचा प्रचंड वेगाने विकास झाला. भविष्य काळाची गरज ओळखून विद्यानगरी येथे १५६ एकरात भव्य असे शैक्षणिक संकुल उभारण्यात आले. या संकुलात संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय, विविध माध्यमांच्या शाळा, पुणे विद्यापीठांशी संलग्नित सर्व प्रकारची महाविद्यालये, जैवतंत्रज्ञानाची संशोधन संस्था, सुसज्ज ग्रंथालये, अद्यावत व्यायाम शाळा, भव्य अशी क्रीडांगणे, वसुंधरा रेडिओ वाहिनीचे केंद्र, एकाच वेळी अडीच हजार विद्यार्थी मावतील असे गदिमा सारखे एकमेवाद्वितीय वातानुकूलित सभागृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे. आदरणीय पवार साहेबांना मिळालेल्या भेटवस्तूंचे जनवास्तु संग्रहालय या संकुलात असून ते सर्वांसाठी विनामूल्य खुले असते. संस्थेचे अनेक विद्यार्थी जगभर विविध क्षेत्रात कार्यरत असून त्यांनी विद्या प्रतिष्ठानचा झेंडा साता समुद्रा पलीकडे फडकवला आहे. बरेच विद्यार्थी आयएएस अधिकारी, सैन्यात दलातील अधिकारी, डॉक्टर्स, इंजिनियर्स, शास्त्रज्ञ, खेळाडू, कलाकार तसेच शैक्षणिक व औद्योगिक क्षेत्रात भारतासह अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया येथे कार्यरत आहेत हे भुषणावह आहे. विद्या प्रतिष्ठान संस्थेमधील सहा विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत व ६६ विद्यार्थ्यांनी एमपीएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केलेले आहे. संस्थेने उद्योजकता विकासासाठी खास विभाग सुरू केला आहे. असंख्य विद्यार्थी विप्रो, इन्फोसिस, टीसीएस, कॅपजेमिनी इत्यादी आंतरराष्ट्रीय आयटी कंपन्यांमध्ये कार्यरत आहेत. विद्या प्रतिष्ठान मध्ये आज एकूण २९ शाळा व महाविद्यालये आहेत. त्यापैकी १७ शाळा असून (एसएससी ९, सीबीएसई ५ आयसीएससी ३) ११ महाविद्यालये व एक संशोधन संस्था आहे. मा. पवार साहेबांच्या बरोबरच मा. अजित पवार, सौ सुप्रिया सुळे, सौ.सुनेत्रा पवार व संचालक मंडळाच्या आजी व माजी सदस्यांच्या संकल्पनेतून संस्थेची योग्य दिशेने वाटचाल सुरू आहे. संस्थेच्या आवारात आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंटर आफ एक्संलंसही सुवर्ण महोत्सवी वर्षात सुरू होत आहे. संस्थेच्या विविध शाळा महाविद्यालयात आज ३०,०१० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत (१३७७३ मुली, १६२३७ मुले) तसेच संस्थेत १७६८ उच्च विद्या विभूषित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेला नुकतीच विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयाकडून सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च ऑर्गनायझेशन्स, अशी मान्यता प्राप्त झाली आहे. विद्या प्रतिष्ठान संकुलातील विविध महाविद्यालयांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थाबरोबर सामंजस्य करार केलेले आहेत ज्यामुळे ग्रामीण भागातील मुला-मुलींना जागतिक दर्जाचे ज्ञान व संधी उपलब्ध होत आहेत. संस्थेतील शिक्षक अहोरात्र विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकाससाठी व त्यांच्यातील सुप्त गुण हेरून त्यांना योग्य दिशा व संधी देण्यासाठी झटत आहेत. अनेक शिक्षकांना राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सन्मानही प्राप्त झालेले आहेत. विद्या प्रतिष्ठान संस्थेला आज पर्यंत विविध क्षेत्रातील अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील दिग्गज व्यक्तीमत्त्वांनी भेट देऊन संस्थेचा गौरव केला आहे. यामध्ये भारताचे माजी राष्ट्रपती प्रख्यात वैज्ञानिक डॉ. एपीजे अब्दुल कलाम, डॉ प्रतिभा पाटील, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरूण जेटली, ख्यातनाम गायिका लता मंगेशकर, सुप्रसिद्ध क्रिकेटपटू कपिल देव व सचिन तेंडुलकर, डॉ एम एस स्वामिनाथन, डॉ सॅम पित्रोदा, डॉ रघुनाथ माशेलकर, तडफदार पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, राष्ट्रीय हॉकीपटू धनराज पिल्ले यांचा समावेश करता येईल. विद्या प्रतिष्ठानच्या या सुवर्ण महोत्सवी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

Regards,
Dr. Bharat Shinde
Principal